Wednesday, February 23, 2011

किल्ले नरनाळा

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 

अकोला जिल्ह्यातील हा अतिशय दुर्गम गिरिदुर्ग.

स्थान

अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्या पासुन याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासून गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही.

भौगोलिक माहिती

गड जमीनीपासून ३१६१ फुट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकर असून गडाच्या कोटाची (तटबंदी) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुदा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरीदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखल्या जात असून तेलीयागड आणि जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.

किल्ल्याबद्दल

गडाच्या प्रवेशाला पाच दरवाजे लागतात त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानुर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गुळफुटाने वाहावे व तडक गड उतरावा. तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.




पाहण्यासारखी ठिकाणे

गडावर आजही राणी महाल व बाजूची मस्जिद अस्तित्वात आहे. त्या समोरचा सभामंडप आता नसला तरी त्याचे स्तंभ त्याच्या विस्ताराचे भान करून देतात. सरळ पुढे गेल्यास तेला- तूपाचे टाके लागतात. खोल टाक्या असून त्यात विभागणी केलेली आहे; आणि त्यांना युध्दकाळात तेल-तूप साठवण्यासाठी वापरल्या जात असे.

गडाच्या तटाच्या बाजूने फिरत गेल्यास थोड्या अंतरावर 'नऊगजी तोफ' दिसते. ही तोफ अष्टधातुची असून इमादशहाच्या काळात गडावर आणल्या गेल्याचे बोलले जाते. तोफेवर पारशीत लेख कोरलेला आहे. तोफेचे तोंड गडपायथ्याच्या शहानुर गावाकडे रोखलेले आपणास लक्षात येते. बाजूला खूप खोल असे चंदन खोरे आहे. या खोर्यात चंदन व साग झाडांची फार दाट पसरण आहे.


ऐतिहासिक महत्व


गड नेमका कुणी आणि कोणत्या काळात बांधला या बाबत नक्की माहिती नाही पण स्थापत्य व ऐतिहासिक पुराव्या वरून हा गड 'गोंड राजांनी' बांधला असल्याचे बोलले जाते. गडावर नागपूरकर भोसले कालीन तुळशी वृंदावन व हनुमान मंदिर आहे. गडावर राम तलाव व धोबी तलाव यांसहित २२ तलाव आहेत. गडाला ६४ बुरूज आहेत. भक्कम तटबंदी व दुर्गम पहाडी यांच्या सहीत हा दुर्ग सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडून विशेषतः माळव्यातुन येणा-या आक्रमणांना तोंड देत झुंजला असेल. या गडावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment