Monday, February 21, 2011

धारावीचा काळा किल्ला

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी

मुंबई महानगरी ही महाराष्ट्राची राजधानी आहे. अरबी समुद्राच्या किनार्‍यावर मुंबई वसलेली आहे. सातबेटाचा हा समुह होता. या बेटांच्या मधल्या भागात भर घालून जमीन तयार करण्यात आली आणि त्यावर आजची मायानगरी मुंबई उभी राहिली.



पुर्वी असलेल्या या बेटांवर सरंक्षणासाठी किल्ले बांधलेले होते. अशा आठ - नऊ किल्यांच्या नोंदी आपल्याला आढळतात. या मधील काही किल्ल्यांचे नोंदी आपल्याला आढळतात. या मधील काही किल्ल्यांचे अस्तित्व पुर्णपणे नाहीसे झाले आहे तर काही कसे बसे तग धरुन आहेत. अशा किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे धारावीचा किल्ला होय.

धारावी मधे किल्ला आहे याचे अनेकांना आश्चर्य वाटते. कारण धारावीची प्रसिद्धी इतर कारणांनी अगदी जगप्रसिद्ध झालेली आहे. धारावीच्या या लहानशा किल्ल्याला काळा किल्ला म्हणतात. स्थानिक लोकांमधे तो काळा किल्ला अथवा ब्लॅक फोर्ट म्हणूनच प्रसिद्ध आहे.

गाढी नदी सागराला मिळते त्याला माहिमची खाडी अथवी माहिम ज्ञिक असे ही म्हणतात. या खाडीच्या दक्षिणतीरावर काळा किल्ला बांधलेला आहे. मराठय़ांनी माहीम खाडीच्या उत्तरेकडील साष्टीचा भाग जिंकून घेतला होता. मराठय़ांची पाऊले केव्हाही मुंबईत शिरु शकतील म्हणून इंग्रजांनी सावधगिरीचा उपाय म्हणून काळ्या किल्ल्याची बांधणी केली इ.स.१७३७ मधे गव्हर्नर असलेला जॉन हॉर्न याने गाढी नदीच्या तीरावर याची निर्मिती केली. या किल्ल्याच्या निर्मितीच्या वेळी शेजारुन नदी वहात होती. आतामात्र नदीच्या पात्रात मोठय़ा प्रमाणात भर घालून रस्ता आणि इतर बांधकामे झालेली असल्यामुळे काळा किल्ला नदीपासून दूर झालेला आहे.




धारावीच्या जगप्रसिद्ध झोपडपट्टीचा विस्तार किल्ल्याच्या भोवतीही वाढलेला असल्यामुळे किल्ल्यापर्यंत पोहोचणे अवघड झालेले आहे. काळाकिल्ला अनोखा आहे. यांची बांधणीही वैशिष्ठपूर्ण असून तो त्रिकोणी आकाराचा आहे. याचे वैशिष्ठ म्हणजे याला दरवाजा नाही. शिडीवरुन तटबंदीवर चढायचे आणि आत उतरायचे. आत उतरण्यासाठी मात्र पायर्‍या केलेल्या आहेत. तटबंदीच्या बाहेरील बाजूस शिलालेख आहे. या लहानशा किल्ल्याचा वापर बहुदा दारुगोळा साठवण्यासाठी इंग्रजांनी केला होता. किल्ल्याच्या अठरा वीस फूट उंचीच्या तटबंदीवर आता झाडीही वाढू लागली आहेत. या झाडांच्या मुळांनी तटबंदीला मोठी हानी पोहोचते आहे. याचे भान ठेवून वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.

काळा किल्याची तटबंदी एकदा का ढासळली तर परिसरातील झोपडपट्टी किल्ल्याचा केव्हा घास घेईल हे कळणार नाही. धारावी बस डेपो जवळून किल्ल्याकडे जाणारा मार्ग त्यातल्यात्यात सोयीचा आहे.

प्रमोद मांडे
सौजन्य - महान्यूस 

No comments:

Post a Comment