Thursday, March 10, 2011

किल्ले सिंहगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी     



पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फुट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायर्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठुनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापुर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो.

इतिहास:

पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांच्या निधनानंतर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला आणि गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता. हा मुळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला.सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळच्या सैन्याने हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि जीवनाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे नाव सिंहगड असे बदलले. सिंहगड हा मुख्यतः प्रसिध्द आहे तो तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे.या युध्दाबाबत सभासद बखरीत खालील उल्लेख आढळतो:



तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करुन वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योध्दे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करुन त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सुर्याजी मालूसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरुन उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'एक गड घेतला, परंतु एक गड गेला'.
माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.



गडावरील ठिकाणे:

दारूचे कोठार:
दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे दिसणार्या कोठारावर दि. सप्टेंबर ११ इ.स. १७५१ मध्ये वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसाचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

टिळक बंगला:
रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या बंगल्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक राहण्यासाठी येत. इ.स. १९१५ साली लोकमान्यांची आणि महात्मा गांधींची भेट याच बंगल्यात झाली.

कोंढाणेश्वर:
हे शंकराचे मंदिर असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी आणि सांब असून हे मंदिर यादवकालीन आहे.

देवटाके:
तानाजी मालूसरे यांच्या स्मारकाच्या मागे डाव्या हाताला हे प्रसिद्ध पाण्याचे टाके आहे. याचा उपयोग आजही पिण्याचे पाण्यासाठी म्हणून होत आहे. म. गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम या टाक्याचे पाणी मागवत असत.

कल्याण दरवाजा:
गडाच्या पश्चिमेस असणारा ह्या दरवाजावर शिलालेख आढळतो


गडावर जाण्याच्या वाटा:

सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरु मैदानाकडून जाणारा हा रस्ता अंदाजे ३५ कि.मी. आहे.

मार्ग: 
स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा.

स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी उपलब्ध असतात.

Wednesday, March 9, 2011

किल्ले राजगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी   


किल्ले राजगड: हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड! शिवतिर्थ रायगड! 
हिंदवी स्वराज्याची राजधानी गडांचा राजा, राजियांचा गड राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. 
बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर अन् भोरच्या बायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नांच्या खो-यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली.राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो. 

इतिहास: इतिहासातून अस्पष्ट येणा-या उल्लेखांवरुन सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वी पासूनचा हा डोंगर आहे. ब्रम्हर्षी ऋषींचेयेथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरुन डोंगर फार पुरातन असावा.राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव हा किल्ला बहमनी राजवटी मध्ये याच नावाने ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते. इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरूंबदेव हा किल्ला हस्तगत केला. मुरुमदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरूमदेव किल्ला निजामशाही कडून आदिलशही कडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिलीमकर व त्याचे वडीलरुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते. 
मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबरावाने मुरुमदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखामाकडे दिला. १६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुमदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला. या कामगिरी बद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिलीमकरांचा नंतर सन्मानही केला. शिवरायांनी मुरुमदेवाचा किल्ला कधी 
घेतला याचा लिखीत पुरावा आज मात्र उपलब्ध नाही त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणे अनिश्चितच आहे. 


शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, 'शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.' सभासद बखर म्हणतो की, 'मुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले त्याचे नाव राजगड म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणली आहे.' मात्र सन १६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठा झपाटाने सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले.इसवीसन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही ६ एप्रिल १६६३ रोजी शाहीस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले. 

सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठांनी किल्ल्यावरुन विलक्षण मारा केल्या मुळे मुगलांना माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे'सत्तावीस किल्ले तांब्रास दिले. निशाणे चढविली वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे व निलोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला.' शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरुप पोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरुनच १६७० मध्ये पाठविले. 

सन १६७१-१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी निश्चित केले आणि राजधानी रायगडावरुन राजगडाकडे हलविली. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडून ठार मारले यानंतर मुगलानी मराठांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मुगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र आप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने 'कानद खो-यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मुगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्या बद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत ' असा आदेश दिला होता. 


पुढे ११नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून ावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडा जवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच त्याच उंचीचे दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडीमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड'असे ठेवले.
 
२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवा बरोबर राजगडावर स्वारी करुन तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या स्वाधीन झाला. पुढे शाहुच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहुने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली.पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाई मध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थिती मध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते - राजवाडे खंड १२. यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिलीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबत-पवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत- खोपडे घराण्यातील या शिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारी सुद्धा असत.
 
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे 

सुवेळा माची:
 
पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेलं की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोडं वर आलं की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरुज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला तुलनेने ही सोपी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे , एक ब्रम्हर्षी मंदिर आहे.
 


पद्मावती तलाव: 
गुप्तदरवाजा कडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा प्रमाणात साचला आहे. रामेश्र्वराचे मंदिरःपद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वभिमुख असे रामेश्र्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतिरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.

राजवाडाः 
रामेश्र्वर मंदिरापासून पाय-यांनी वर जातांना उजवीकडे राजवाडाचे काही अवशेष दिसतात.या राजवाडामध्ये एक तलाव आहे.या शिवाय राजवाडापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो.याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारुकोठार आहे. सदरःही गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू. रामेश्र्वर मंदिरापासून पाय-यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाडाचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे.अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे. पाली दरवाजाःपाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पाय-या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेश द्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेक-यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.

संजीवनी माचीः 

सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरुन उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुंज लागतात. या तिन्ही बुरुजावर शिवकालात प्रचंड मोठ्या तोफा असाव्यात या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदी कडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळु दरवाजाने सुद्धा येते. आळु दरवाजा पासून राजगडाची वैशिष्टय असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पाय-यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. 
 

दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. आळु दरवाजा संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून जात असे. आळु दरवाजा सस्थितीला ब-यापैकी ढासाळलेल्या अवस्थतेत आहे. या दरवाजावर एक शिल्प आहे. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे असे चित्र या शिल्पात दाखवले आहे. सुवेळा माचीःमुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणा-या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटे दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. 
येथे असणारे चौथरे येसाजी कंक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुस-या टप्पयावर जाते तर डावीकडे जाणारी वाट काळेश्र्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते. आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरु होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुस-या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुस-या टप्पयाकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते या खडकालाच नेट किंवा 'हत्तीप्रस्तर' असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात.हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे.

बालेकिल्लाः 
राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तरबुरुच आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे.ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात.येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे.या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाडांचे अवशेष आढळतात. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात.
 


गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.
 
गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. 

१.गुप्त दरवाज्याने राजगड: पुणे - राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते.बाबुदा झापा पासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत.यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते.यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात. २.पाली दरवाज्याने राजगडः पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे पाबे या गावी उतरुन कानद नदी पार करुन पाली दरवाजा गाठावा.ही वाट पाय-याची असून सर्वात सोपी आहे.यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात 
३.गुंजवणे दरवाज्याने राजगङ: पुणे वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते.ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात.माहितगारा शिवाय या वाटेचा उपयोग करू नये.
 
४.अळु दरवाज्याने राजगडः भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो.शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.
 
५.गुप्तदरवाजामार्गे सुवेळामाची: गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे सुवेळा माचीवर येते.
 


राहण्याची सोय: 
१.गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते. २.पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत. 

जेवणाची सोय: आपण स्वतः करावी.
 


पाण्याची सोय: पद्मावती मंदिराच्या समोरच बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. 
जाण्यासाठी लागणारा वेळ: ३ तास

किल्ले रायगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी    



किल्ले रायगड मराठी साम्राजाच्या इतिहासामध्ये एक खास ओळख धरुरू आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून १७व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवण्याचे निश्चित केले. महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला.अफ़झलखानाच्या स्वारीच्या काही महिने अगोदर त्यांनी रायरीचा किल्ला यशवंतराव मोरे याच्या कडून जिंकून घेतला आणि रायरीची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेउन येथे बुलंद किल्ला बांधावा असे मनी घेतले. महाराजांचे त्यावेळचे शब्द बखरीत मिळतात. "दीड गाव उंच - देवगिरीच्याहुन दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुषीने म्हणाले - तख्तास जागा हाच गड करावा."

महाराजांच्या पश्चात सुमारे सहा वर्षे रायगड राजधानी होता. गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक-खुबलढा बुरुज व दोन-नाणे(नाना)दरवाजा. याशिवाय कठीण अश्या हिरकणी कड्यावरुन उतरणार्या हिरकणीची कथा प्रसिद्ध आहेच. गडावर जाण्यासाठी सध्या रोप वे ची सोय आहे.




पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाडगावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायर्या चढून गेलं, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असे म्हणू लागले आहेत.



जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.



या गुहेत सतत वाहणारा थंडगार वारा, एकापाठोपाठ येणार्या थंड वार्याच्या झुळुका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्ग यात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचे जुने वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा याचं आकर्षण येथे भेट देणार्याला पडते.




शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. गडावर दोरवाटेने पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायर्या चढून रायगडावर पोहोचता येते. पर्यटकांनी अवश्य पाहावी अशी वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा रायगडावर आहे.

किल्ले विसापूर

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी  



पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवनामावळात मोडणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण हा विसापूर किल्ला करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही.

इतिहास :

मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. १६८२ मध्ये मराठांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले




गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
पाय-यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत.
गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी आपले लक्ष्य वेधून घेते. गडावर एक मोठे जातंही आहे



गडावर जाण्याच्या वाटा :

मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.
१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाडा घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पाय-या आहेत. या पाय-या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण मोडकळीस आलेल्या पाय-यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.
२) दुस-या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.
३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्स्प्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.



राहण्याची सोय : गडावर रहाण्यासाठी दोन गुहा आहेत.

जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतःच करावी.

पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्यासाठी तळी आहेत.

जाण्यासाठी लागणारा वेळ : अडीच तास.

किल्ले लोहगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी   



पवनामावळात असणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचाक संरक्षक असणारा हा लोहगड पुणे - मुंबई हमरस्त्यावरून सहजच नजरेस पडतो. पुण्या आणि मुंबईपासून जवळ असल्या कारणाने येथे ट्रेकर्स मंडळींची नेहमीच ये जा चालू असते. किल्ल्याच्या पोटात भाजे आणि बेडसे या प्रसिध्द लेण्या आहेत.. मुंबई - पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. महामार्गापासून जवळच असल्याने पायथ्याच्या गावात सर्व सुखसुविधा आहेत.

इतिहास :

लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.इ. स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने
निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. इ. स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ. स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड - विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ. स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ. स. १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला.
१७२० मध्ये आंगर्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला.इ. स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू - नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला.
त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.





गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. सर्वप्रथम
१. गणेश दरवाजाः- ह्याच्याच डाव्या - उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीचीपाटिलकी देण्यात आली होती.येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.

२. नारायण दरवाजाः- हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई.

३. हनुमान दरवाजाः- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.

४. महादरवाजाः- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले.महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखानाचे भग्र अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे.उजवीकडे ध्वजस्तंभ आहे.याच्या जवळच एक तोफ काही हौश दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथ-यात बसवलेली आहे.अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीत राहाण्याची सोय होते.या कोठीत अनेक खोल्या आढळतात.दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे , जिथे एक सुंदर शिवमंदिर आढळते.पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे.हे तळ अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे.ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे.



तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते.नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे.हे तळं सोळाकोनी आहे.मोठा तळ्याच्या पुढे विंचुकाटाकडे जातांना वाडांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. या विंचूकाटास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते . गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो,म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात.या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते. गडाच्या आजुबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाटा चा उपयोग होत असावा. या गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेण्या आवर्जून पाहव्यात.पावसाळ्यातील लोहगडाचे रुप पाहिले की मनोन्मनी गुणगुणतं...। ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी। आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी ॥


गडावर जाण्याच्या वाटा :

लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
१) पूण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणा-या मळवली स्थानकावर उतरावे.तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणरी वाट पकडावी.वाट मोठी आणि प्रशस्त आहे.तिथून दीड तासांच्या चालीनंतर 'गायमुख' खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी.खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास प ास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो.या मार्गेलोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.

२) लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडावाडी पर्यंत जाता येते.पवना धरणाकडे जाणा-या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून ३ ते ४ किं मी अंतरावर लोहगडावाडी आहे.उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत.साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे.मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही.स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून ट्रॅक्सने जाता येते मात्र ट्रॅक्सभाडे १००० रु आहेत.

३) काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे.तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो.पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेक टेकडीवर जातो तेथून एक मळलेलीपायवाटआपणासलोहगडावाडीत घेऊन जाते.या टकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे.या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.


राहण्याची सोय : लक्ष्मी कोठी रहाण्याची एकमेव सोय आहे.३० ते ४० जण आरामात राहू शकतात.
जेवणाची सोय : आपण स्वतः जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्यक जेवणाची सोय होते
पाण्याची सोय : बारामही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : २ तास.

किल्ले रोहीडा

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी  



सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्र्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खो-यात वसलेला किल्ला म्हणजेच 'किल्ले रोहीडा'. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खो-याच्या काही भागात वसलेले आहे. या खो-यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहीडा किल्ला हे रोहीड खो-याचे प्रमुख ठिकाण होते. पुणे सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी दूधयोजना यामुळे येथील परिसरातील बहुतेक सर्व गावापर्यंत बस, वीज आदी सुविधा पोहचल्या आहेत. त्यामुळे येथील जीवन सुखी झालेले आहे. रोहीडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहीडा किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.





इतिहास :

या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तीस-या दरवाजावर असणा-या शिलालेखावरून
मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. या शिलालेखावरून मे १६५६ नंतर हा किल्ला शिवाजी
महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला असे समजते. किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली. यात कृष्णाजी बांदल मारला गेला. बाजीप्रभू देशपांडे बांदलाचे मुख्य कारभारी होते. लढाईंतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहका-यांना स्वराज्यात सामील करून घेतले गेले. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला.कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहीडाचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवाजी महाराजांच्या अधिका-यांनी शिवाजी महाराजांकडे विचारणा केली की ३० च होन का, शिवाजी महाराजांनी निर्णय दिला की, जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोघलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा ही किल्ला भोरकरांकडे होता.




गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायया पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे. याचे पाणी बाराही महिने पुरते. येथून ५-७ पाय-या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर ब-याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी व उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे. आजुबाजूच्या
तटबंदीची पडझड झाली आहे. ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे. येथून आत शिरल्यावर समोरच २ वास्तू दिसतात.एक गडावरील सदर असावी तर दुसरे किल्लेदाराचे घर असावे. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर रोहिडमल्ल उर्फ भैराबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहीडाचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्रेयेस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज व पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहेत. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी आहे. संपूर्ण गड फिरण्यास दीड तास पुरतो.




गडावर जाण्याच्या वाटा :
बाजारवाडी मार्गेः दक्षिणेस ८-१० किमी अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीपासून मळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून दरवाजापर्यंत पोहचण्यास एक तास लागतो.अंबवडे मार्गेभोर ते अंबवडे अशी एसटी सेवा उपलब्धआहे.पूणे-भोर-पानवळ-अंबवडे अशी बससेवा देखील उपलब्ध आहे. या गाडीने अंबवडे गावी उतरून गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करावी. ही वाट लांबची आणि निसरडी आहे. या वाटेने गड गाठण्यास सुमारे अडीच तास पुरतात.शक्यतो गडावर जाताना बाजारवाडी मार्गेजावे आणि उतरताना नाझरे किंवा अंबवडे मार्गेउतरावे
म्हणजे रायरेश्र्वराकडे जाण्यास सोपे जाते.

रोहीडा ते रायरेश्र्वर वाटा : १. भोर - कारी बसने कारी गावात उतरावे. तिथून लोहदरा मार्गे२ तासांत रायरेश्र्वर पठाराकडे पोहचतो व पठारावरील वस्ती पर्यंत जाण्यास दीड तास लागतो. २. वडतुंबी मार्गे- दुपारची (२.४५) भोर-टिटेघर गाडी आंबवण्यास येते. तिने वडतुंबी फाटावर उतरावे. तिथून १५ मिनिटांत वडतुंबी गाव गाठणे. येथून साधारणतः २ तासात गणेशदरा मार्गेरायरेश्र्वर पठारावर पोहचता येते. ३. भोर-कोर्लेगाडीने कोर्लेगावात उतरावे. रात्री उशीर झाल्यास गावात मुक्काम करून पहाटे गायदरा मार्गाने ३ तासात रायरेश्र्वर पठारावरील देवळात जाता येते. ४. भोर-दाबेकेघर बसने दाबेकेघरला उतरायचं व तिथून धानवली पर्यंत चालत जायचं. पुढे वाघदरामार्गे३ तासात रायरेश्र्वर गाठायचं.

राहण्याची सोय : रोहीडमल्लच्या मंदिरात ५ ते ७ जणांची रहाण्याची सोय होते. पावसाळ्यात मात्र मंदिरात रहाता येत नाही.जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतःच करावी.पाण्याची सोय : गडावर पिण्याचे पाणी बारमाही उपलब्ध आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ : बाजारवाडी मार्गे- १ तास

किल्ले हरिश्चंद्रगड

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 


 स्थान

हा किल्ला पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे.



भौगोलिक माहिती


पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग बालाघाटची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे.


पौराणिक महत्व

हरिश्चंद्र, तारामती आणि रोहीदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे.






गडावर जाण्याच्या वाटा



सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. त्यापैकी पाचनई कडील वाट आणि खिरेश्वरकडून जाणारी वाट दुर्गप्रेमी मंडळींना सोयीची आहे.खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने तिचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो.

कल्याण -अहमदनगर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होवू शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.




किल्ल्याबद्दल


हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पुर्व बाजूला इंग्रजी यु आकाराची खिंड होय. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध टोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा होय.
रस्त्यातील व्याघ्रशिल्प

पायथ्यापासून टोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेवून जाते. खिंडीतून चढणारी वाटेवर खडकात पायठाण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.

येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या धोपटमार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो.


पाहण्यासारखी ठिकाणेयेथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.

हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे.
गणपती,हरिश्चंद्रेश्वर मंदिर





मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.



कोंकणकडा

हरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रुप पहावे लागते. येथून स्वच्छ हवेमध्ये कल्याण पर्यंतचा प्रदेश दिसतो.







हरिश्चंद्रगडावरुन शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरख, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली, अलंग, कुलंग, मदनगड, कलाडगड, भैरवगड (मोरोशी) तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.

गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे.
[संपादन] ऐतिहासिक महत्व

महाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रितील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.